नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मागील टर्ममध्ये महत्वाची जबाबदारी संभाळणाऱ्या अरुण जेटली यांनी नवीन सरकारमध्ये आपल्यावर कुठलीही जबाबदारी टाकू नये अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्राद्वारे केली आहे.
मोदींना लिहलेल्या पत्रात अरुण जेटली म्हणतात, "मागच्या पाच वर्षांत तुमच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा भाग असणे माझ्यासाठी अभिमानास्पद राहिले आहे. मागच्या 18 महिन्यांपासून मला प्रकृतीच्या गंभीर त्रासांना सामोरे जावे लागले आहे. माझ्या डॉक्टरांनी यापैकी बहुतेक त्रासांतून सुटका करण्यास माझी मदत केली आहे. मला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याबाबत मी तुम्हाला प्रचार मोहिमेतच तोंडी सांगितले होते. नवे सरकार उद्या शपथ घेणार आहे. यामुळे मी औपचारिकता म्हणून तुम्हाला पत्राद्वारे याबाबत विनंती करत आहे. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला सध्याच्या तसेच नव्या सरकारमध्येही कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये. मला माझ्या उपचारांसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यामुळे मी तुम्हाला यासाठी विनंती करत आहे."
- अरुण जेटली
मागील सरकारमध्ये वित्तमंत्री म्हणून काम पाहिलेल्या जेटली यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब आहे. यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचारसुद्धा घेतले. त्यावेळी हंगामी अर्थमंत्री म्हणून पियुष गोयल यांनी अर्थमंत्रालय सांभाळले होते.
येत्या ३० तारखेला १७ व्य लोकसभेचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपत घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळते यावर माध्यमात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. जेटली यांनी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केल्याने मोदींच्या नव्या मांत्रिमंडळात जेटली नसतील हे मात्र, आता स्पष्ट झाले आहे.